#beingaajoba

“अगं आधी माझ्याकडे भरपूर नवीन कपडे आहेत ते बघ. त्यातूनच काहीतरी काढ शोधून.”, इति आजोबा.
माझ्या लग्नात आजोबांनी कोणते कपडे घालावे हे ठरवण्याकरता मी त्यांचं कपाट उघडलं. आजोबांकडे फार काही मोठं ‘wardrobe collection’ नाही हे तर मला माहित होतं, पण त्यांच्याकडे इतके कमी कपडे असतील ह्याचा मला त्या मोकळ्या, ओसाड पडलेल्या खणांकडे बघून शोध लागला.
”आजोबा! तुमच्याकडे फक्त ११ शर्ट आहेत आणि त्यातलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे असलेलं सगळयात नवीन कापड हे किमान ५ वर्ष जुनं आहे!”
“अगं! थांब तुला सफारी दाखवतो माझ्या!” असं म्हणत आजोबा माझ्या आत्यांच्या लग्नात घातलेले कपडे दाखवायला ‘माझ्याकडे बघ किती खजिना आहे!’ अशा थाटात पुढे सरसावले. आजीनी कपाळावर हात मारला. २० वर्षांपूर्वीचे कपडे म्हणजे ”तसा नवीनच आहे. मी कुठे घातलाय एवढा?” असं म्हणणाऱ्या माझ्या आजोबांना मी “looks” देत आईबाबाबांना म्हटलं, “चायला, आपण आजोबांची शॉपिंग खूपच lightly घेतली. पहिलं त्यांना घेऊन जाऊ उद्या.”
‘माझ्या आजोबांचे कपडे’ हा एकंदरीतच घरातला आवडीचा विषय. त्यांचा घरी घालायचा एकमेव गुलाबी शर्ट असो किंवा त्यांचा भोक पडलेला ‘गंजी फ्रॉक’ असो. आणि होय, आमच्याकडे बनियन ला ‘गंजी फ्रॉक’च म्हणतात.
पण ह्याच माझ्या आजोबांबद्दल एक पुस्तक लिहून काढता येईल एवढे कंगोरे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. स्वतः वर कधीही वायफळ खर्च न करणारे, नाका समोर चालणारे, भरपूर वाचन करणारे, सगळ्या नातवंडांना इंग्लिश आणि संस्कृत शिकवणारे, रोजचे वर्तमानपत्र छापणाऱ्यानेही बघितले नसेल इतक्या बारकाईने वाचणारे, गोडाचे महाशौकीन, तल्लख बुद्धी आणि माझ्यावर सगळ्यात जास्त जीव असलेल्या आजोबांविषयी आज उगीचच लिहावासं वाटलं.
वयाच्या ३०व्या वर्षापासूनच आजोबांचा एक डोळा काचबिंदूमुळे पूर्ण बंद आणि दुसरा मोतिबिंदूमुळे फक्त २५% काम करतो हे मला ५वीत समजलं. कारण त्यांच्या वागण्याबोलण्यातून कधी जाणवलच नाही मला! त्यांनी कधी त्याचा स्तोम नाही माजवला की कौतुक नाही केलं. मी जी २६ वर्ष त्यांना ओळखते त्यात एकदाही “मला दिसत नाही. मला जमणार नाही” असं वाक्य मी त्यांच्या तोंडातून ऐकलं नाही.
मी घरातलं शेंडेफळ; माझ्या आजी आजोबांची सगळ्यात धाकटी नात. माझ्या २६व्या वर्षातसुद्धा मला आजी आजोबा आहेत, ते ही जसे होते तसे, ह्यासारखं दुसरं luck तरी काय? लग्नानंतर मध्ये गणपतीला घरी आले तेव्हा आजोबा वयाच्या ८७व्या वर्षी, मला हवी म्हणून बासुंदीसाठी ५लिटरचे अडीच लिटर होईपर्यंत दुध आटवत बसले होते. आजी त्यांच्या मागे बासुंदीची इतर तयारी करत उभीच होती.
वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत पार्ला ते दादर up-down करून, भर भर पावलं टाकत संस्कृतच्या शिकवण्या करायला जायचे. त्यांच्या मते रिक्षा करणे हे महा पाप करण्यासारखं असल्यामुळे अर्धा अर्धा तास चालत जायचे सगळीकडे. आणि एखादवेळेस रिक्षा केलीच तर मग ती मज्जा अजून वेगळीच. त्या रिक्षावाल्याला नको इतकी माहिती देत, अधून मधून “righttttt” आणि “lephttttt” असं म्हणायचं. ”जरा side में खडा करो. ये इस्को उतरके वो बिल्डिंग में जाना है जरा… वो क्या है, उस्का क्लास है उधर…” अशी सुरुवात करून पुढची १० मिनटं, मध्ये रिक्षा का थांबवली ह्याचं कारण समजावून सांगायचं. मग काय? संध्याकाळी घरी आल्यावर टिंगल करायला आम्हाला मिळालाच की विषय!
आता आजोबांच्या काही सवयी माझातही उतरल्यात. उदाहरणार्थ, गाळण्यात अडकलेली चहा पावडर चमच्याच्या उलट्या बाजूने दाबून त्यातला एक थेंबही फुकट न दवडणे, ज्या ताटात जेवलो ते ताट वापरलंय की नाही असा प्रश्न पाडण्याइतके साफ करणे, आवाजाच्या वरच्याच पट्टीत बोलणे, इत्यादी.
माझे कणखर पण प्रेमळ आजोबा आता मात्र थोडे थकले आहेत. कंबर आणि ढोपरं दोघेही त्यांच्यावर रुसलीयेत. आपल्याला बघण्याखेरीज काहीच करता येत नसल्यामुळे helpless होणं हा एकमेव option. मी पुण्याला परत जायला निघाले की आजीआजोबा आतल्या खोलीत जाऊन निमूट रडत बसतात. मी निघायच्या आद्ल्यादिवशीपासून आजोबांच्या चेहऱ्यावर भलं मोठं टेन्शन असतं. मी गेल्यावरसुद्धा पुढचे दोन दिवस, “मनी गेली ना गं?” असं दिवसातून दहा वेळा तरी आजीला विचारतात. मग आमचा regular Skype lunch करताना, काही न बोलता नुसते माझाकडे एकटक बघत बसतात. हल्ली अधूनमधून थोडंथोडं विसरतातही आणि मग बिचारे आमच्या टर उडवण्याचा विषय बनतात. आता my आजोबा being the आजोबा that he is स्वतःवरसुद्धा मोकळ्या मानाने हसतात ही गोष्ट वेगळी.
“आजोबा चहा करा ना!” पासून “आजोबा चहा करते हं!” पर्यंतची आमची २६ वर्षांची journey आता आता एका क्षणाची वाटू लागली आहे.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s